आयुष्यात भेटलेली माणसं
आयुष्यात भेटलेली माणसं
लेख क्र.१
कोरोना प्रादुर्भावामुळे घरात बसून काय करायचे हा विचार चालला होता मग विचार आला की आपल्या आयुष्यात कुटुंबाव्यतिरिक्त अशी अनेक माणसे आपल्याला भेटली की ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली व ज्यांचा आपल्या यशात, आपल्या जीवनात महत्त्वाचा वाटा आहे अशा व्यक्तींबद्दल लिहावं....पण प्रश्न पडला सुरवात कोणापासून करावी पण याबाबत जास्त पर्याय न येता पहिलं नाव आलं ते अर्थातचं प्रा. अनिल वर्तक सरांचं..
सर स.प. महाविद्यालय, पुणे या ठिकाणी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत.
सरांची आणि माझी भेट झाली ती S.P.कॉलेजमध्येच. मी M.A ला तिथे प्रवेश घेतल्यानंतर सुरवातीच्या काही दिवसात सरांचा व माझा फारसा संबंध आला नाही परंतू नंतर सरांच्या स्वभावामुळे व त्यांच्या क्रियाशील व्यक्तीमत्वामुळे सरांच्या खूप जवळ जाता आले. सरांनी ज्यावेळी ठरविले की अर्थशास्त्र विभागात अवांतर वाचनाची लायब्ररी सुरू करायची त्यावेळी ही जबाबदारी कोणा एका विद्यार्थ्याकडे द्यायचे हे ठरविले त्यावेळी त्यांनी ही जबाबदारी माझ्याकडे दिली. त्यावेळेस सरांबरोबर राहून काय वाचावे, कोणती पुस्तके उपयुक्त असतील हे शिकलो. त्या काळातच माझे खूप अवांतर वाचन झाले ते आजही माझ्या आयुष्यात उपयोगी पडत आहेत.
आमच्यासारख्या गावाकडून गेलेल्या विद्यार्थ्यांना सरांमुळे कधी वाटलं नाही की इतक्या मोठ्या महाविद्यालयात येऊनही आम्ही कुठे कमी आहोत की, आमच्यातला न्यूनगंड जागा झाला आहे.
सरांना सामाजिक समस्यांची खूपच जाण, त्यामुळे सर नेहमी सामाजिक प्रश्नांबद्दल अभ्यास करून त्यावर विद्यार्थ्यांनाही नेहमी त्यावर अभ्यास करायला सांगायचे आणि विद्यार्थ्यांना घेऊन विविध उपक्रम आयोजित करायचे.
सरांमुळे आमच्यातला कलाकार आम्ही जागा केला कारण ॲक्टींगचा व आमचा काही संबंध नव्हता.
निमित्त होते ते सरांनी आम्हाला 'स्त्री भ्रूणहत्या' या विषयावर पथनाट्य तयार करायला सांगितले आणि मग आमची वर्गमैत्रिण अपर्णा कुलकर्णी हिने 'उमलती कळी' लिहिले आणि तिच्यासाहित आम्ही दहा मित्र मैत्रिणींनी पथनाट्य तयार केले आणि त्याचे सादरीकरणही उत्तम झाले. योगायोग असा की त्या पथनाट्याचे रूपांतरण छोट्या नाटिकेत करून पुणे विद्यापीठाततर्फे 'उमलती कळी' ची निवड औरंगाबाद विद्यापीठात होणाऱ्या 'इंंद्रधनुष्य' या सांस्कृतिक स्पर्धेसाठी झाली. हा सर्व सादरीकरणाचा प्रवास खूप काही शिकवून गेला. त्यावेळी जे मित्र मैत्रिणी झाले ती मैत्री आजतागायत घट्ट टिकून आहे. त्यावेळेस सरकारने 'स्पेशल इकॉनॉमिक झोन' ही योजना सुरू झाली होती त्या विषयावरही सरांनी आम्हाला पोस्टर प्रेझेंटेशन करायला सांगितले. तोही खूप छान अनुभव होता.
सरांचे वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक कृती करताना ती अभ्यास पूर्णच झाली पाहिजे. भले त्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल.
माझी पीएच.डी झाल्यानंतर माझ्याकडे जॉब नव्हता तर सरांनी लगेच मला बोलावून घेतले आणि सांगितले 'विशाल आपल्या विभागात एक जागा रिक्त आहे तू याठिकाणी तासिका तत्त्वावर काम करू शकतो'. हे वाक्य माझ्यासाठी खूप मोठा आधार होते कारण त्या वेळेस मला जॉबची खूप गरज होती.
केवळ सरांमुळेच जवळपास दीड वर्ष मी स. प. महाविद्यालयात तासिका तत्वावर अध्यापनाचे काम केले आणि त्याच अनुभवाच्या जोरावर मला अनुदानित तत्वावर काम मिळण्यास फायदा झाला. हे सरांचे हे उपकार मी कधीही विसरू शकत नाही.
त्यांच्या हाताखाली काम करण्याचा एक वेगळा अनुभव होता त्यांनी ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या हाताखाली खूप काही शिकायला मिळाले.
मी अनुदानित तत्त्वावर जेव्हा कामाला लागलो त्या पहिल्या महिन्यात त्यांनी मला सांगितले विशाल तू एक लॅपटॉप घे तुझ्याकडे पैसे नसतील तर ते मी देतो आणि त्यांनी मला पहिला लॅपटॉप घेऊन दिला. त्यांचा त्यामागचा उद्देश होता की जगात जे काही बदल चाललेले आहेत त्याबरोबर चालायला शिकले पाहिजे.
सर रिटायरमेंट नंतरही थांबलेले नाहीत. ते 'स्किझोफ्रेनिया' या आजारावरील रुग्णांसाठी 'सा' ही संस्था चालवतात. या संस्थेत सर उपाध्यक्ष म्हणून काम करतात आणि त्यांचं हे काम उल्लेखनीय व मोलाचे आहे. कारण ही संस्था स्किझोफ्रेनिया या आजारावरील रुग्णांसाठी खूप मोठा आधार बनलेली आहे आणि या संस्थेची व्यापकता वाढविण्यात सरांचा खूप मोठा हातभार आहे. सरांच्या या कामावर खूप काही लिहिता येण्यासारखा आहे.
अशा माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा आहे. सरांमध्ये एक उत्तम मार्गदर्शक, शिस्तप्रिय व्यक्ती, प्रेमळ पालक आणि सर्वांना मित्र म्हणून पुढे घेऊन जाणारा शिक्षक मला भेटला हे माझे भाग्य समजतो.
सरांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊन माझ्या या लेखाचा समारोप करतो.
डॉ. विशाल पावसे
9890176478
Comments
Post a Comment